कान्हेरी गवळी (जि. अक ोला) : येथील एका २८ वर्षे वयाच्या तरुण शेतकर्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रवीण नामदेव तेलगोटे असे मृत तरुण शेतकर्याचे नाव असून, त्याच्याकडे दोन एकर शेतजमीन आहे. या शेतीवर अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाळापूर शाखेचे ३३ हजार ३00 रुपयांचे पीककर्ज होते. त्याच्या शेतात मागील तीन वर्षांंंपासून सातत्याने नापिकी होत आहे. यावर्षीही नापिकी झाल्याने थकीत पीककर्ज कसे फेडावे व वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, या चिंतेने त्रस्त होऊन शुक्रवारी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची तक्रार मृतक प्रवीणचे काका भीमराव तेलगोटे यांनी बाळापूर पोलीस ठाण्यात सायंकाळी केली. त्यावरून बाळापूर पोलिसांनी भादंविचे कलम १७५ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतक प्रवीणच्या पश्चात आई व दोन भाऊ असा आप्त परिवार आहे.
शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या
By admin | Published: November 28, 2015 2:32 AM