लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: किरकोळ वादातून पती, पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस स्थानकापाठीमागील डॉ. आंबेडकर नगरात राहणारा सिद्धार्थ ऊर्फ सम्राट रामदन बावीसाने(२२) याने घराजवळच राहणाऱ्या नीशा नामक युवतीसोबत अडीच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर दीड ते दोन वर्ष दोघा पती, पत्नीचा संसार सुरळीत होता; परंतु नंतर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून खटके उडायला लागले. पती, पत्नीची दररोजचीच भांडणे असल्याने, कुटुंबीयसुद्धा दुर्लक्ष करायचे. अनेकदा त्यांचा वाद सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात पोहोचत असे. पोलीस दोघाही पती, पत्नीची समजूत घालून त्यांची पाठवणी करीत. मृत सिद्धार्थ बावीसाने याने काही वर्षांपूर्वी मलकापूर(बुलडाणा) येथे घर बांधले होते. काही दिवस सिद्धार्थ पत्नीसह मलकापूरला राहायचा. अधूनमधून तो अकोल्यातही यायचा. काही दिवसांपूर्वी त्याच्या पायाला दुखापत झाली होती; परंतु पत्नी त्याच्या भेटीला आली नव्हती. याचे शल्य त्याच्या मनाला बोचत होते. पत्नी नीशा ही मंगळवारी मलकापूरवरून अकोल्याला घरी आली होती. बुधवारी दुपारी दोघेही पायाला प्लॅस्टर बांधण्यासाठी दवाखान्यात गेले होते. तेथून परत आल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने सिद्धार्थ बावीसाने याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. हे पाहून घाबरलेल्या नीशानेसुद्धा गळफास घेतला. असा पोलिसांचा कयास आहे. घटनास्थळाला सिव्हिल लाइनचे ठाणेदार अन्वर शेख यांनी भेट दिली. पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवून दिले. आई-वडील म्हणत होते, घटस्फोट घे...सिद्धार्थ व निशा यांच्यामध्ये नेहमीच किरकोळ कारणावरून वाद होत. घरच्यांना तर त्यांचे वाद नित्त्याचे झाले होते. त्यामुळे आई-वडिलांनी सिद्धार्थला अनेकदा तुझे पत्नीसोबत पटत नसेल तर तिला घटस्फोट दे. ही दररोजची भांडणे, वादावादी चांगली नाही, असा सल्ला दिला होता; परंतु तो सिद्धार्थने ऐकला नाही. त्याने आमचा सल्ला ऐकला असता तर त्याचा जीव गेला नसता, असे त्याच्या आईने बोलताना सांगितले.
दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:47 AM