अकोला : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या खरीप पीकाचे प्रचंड नुकसान झाले. रब्बी हंगामातील पेरणी करण्यासाठी पैसा नसल्याने मनोधैर्य खचलेल्या तरुण शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची पळसो बढे येथे शनिवारी घडली. अमोल बाळू इंगळे (२५) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव असून, त्याच्या वडीलाच्या नावे तीन एकर जमीन आहे.जिल्ह्यातील पळसो बढे येथील रहिवासी बाळु इंगळे यांच्या मालकीची गावातच तीन एकर शेती आहे. त्यांच्या शेतीचा संपूर्ण कारभार त्यांचा मुलगा अमोल इंगळे (२५) पाहत होता. उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून यंदा पहिल्यांदाच अमोलने ८ एकर शेती लागवडीसाठी घेतली होती. सर्वकाही सुरळीत सुरू असताना निसर्गाने मात्र धोका दिला. परतीचा पाऊस लाबंल्याने जिल्ह्यात सर्वत्र खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यात अमोलच्या शेतातील सोयाबीनही गेले. आजी माजी मंत्र्यांकडून झालेल्या नुकसानाची पाहणी झाली; पण सत्ता स्थापनेच्या तिढ्यात शेतकरी बाजुलाच राहिला. अद्यपाही शेतकऱ्यांना कुठलीच मदत न मिळाल्याने शेतकºयांचे मनोधैर्य खचले. अशातच शनिवारी पळसो बढे येथील २५ वर्षीय युवा शेतकरी अमोल इंगळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पळसो बढे गावात शोककळा पसरली आहे. अमोल इंगळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.