सिंदखेडराजा/मोताळा (जि. बुलडाणा) : सततची नापिकी आणि डोक्यावरील कर्जाचा डोंगर यामुळे नैराश्य आलेल्या दोन शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्या. सिंदखेडराजा तालुक्यातील साठेगाव येथील संतोष भागुजी नागरे (वय ४0) या शेतकर्याने सोमवारी सकाळी ८ वाजता गळफास घेऊन शेतात आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाने दु:ख बाजूला ठेऊन मृतकाचे नेत्रदान करुन सामाजिक दायित्व निभावले. संतोष नागरे यांच्याकडे तीन एकर कोरडवाहू शेती होती. यावर्षी झालेल्या अल्प पावसाने शेतीत उत्पन्न झाले नाही. जिल्हा बँकेकडून घेतलेले ६0 हजार रुपयाचे कर्ज आणि हातउसणवारीचे पैसे कसे फेडायची या विवंचनेत ते गेल्या काही दिवसांपासून वावरत होते. यातूनच त्यांनी सोमवारी सकाळी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये त्यांनी बँकेचे कर्ज आणि घर चालवण्यासाठी घेतलेले हातउसने पैसे परत करु शकत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. एक वषार्पुर्वी नागरे यांच्या वडीलांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात दोन मुले, पत्नी व मोठा परिवार आहे. आत्महत्येची दुसरी घटना मोताळा तालुक्यात घडली. सततची नापिकी , कर्जबाजारीपणा यामुळे आलेल्या वैफल्यग्रस्त मनस्थितीमुळे ३५ वर्षीय शेतकर्याने घरातच छताला दोरीचे सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ७ मार्चच्या दुपारी ३ वाजता तरोडा येथे उघडकीस आली. मोताळा तालुक्यातील तरोडा येथील शेतकरी नंदकिशोर काशीनाथ किनगे (वय ३५) यांचेकडे अडीच एकर शेती असून त्यांचेवर बुलडाणा जिल्हा केंद्रीय सह.बँकेचे ६0 ते ७0 हजार रूपये कर्ज थकीत असल्यामुळे ते वैफल्यग्रस्त होते. अशा परिस्थितीत त्यांनी ७ मार्च चे दुपारी घरात कोणी नसतांना छताला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत भागवत प्रभाकर किनगे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बोराखेडी पोस्टेला तक्रार दिली. याप्रकरणी र्मग १२/१६ कलम १७४ जाफौ दाखल करण्यात आलेला असून तपास रामराव राठोड पीएसआयहे करीत आहे. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती त्यांचे नातेवाईकांनी दिली आहे.
दोन कर्जबाजारी शेतक-यांच्या आत्महत्या
By admin | Published: March 08, 2016 2:24 AM