अकोला: जिल्ह्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना १५ ते २0 दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने, या गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. सुकळी येथील तलावातून या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेच्या अंदाजपत्रकास मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत (मजीप्रा) तांत्रिक मान्यता मिळणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे तांत्रिक मान्यतेत अडकलेली योजना केव्हा मार्गी लागणार आणि ग्रामस्थांना पिण्याचे पाणी केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खारपाणपट्टय़ातल्या जिल्ह्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु, यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने महान येथील काटेपूर्णा धरणात उपलब्ध अत्यल्प जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी राखीव करण्यात आला. गत सप्टेंबरपासून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना सुकळी येथील तलावातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला; मात्र सुकळी तलाव ते खांबोरा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी कमी व्यासाची असल्याने, योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे ६४ गावांना १५ ते २0 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असून, या भागात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पृष्ठभूमीवर खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना सुकळी तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी सुकळी तलाव ते खांबोरा येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन जलवाहिनी टाकणे व पाण्याची उचल करण्यासाठी नवीन पंप बसविण्यासाठी १२ कोटी ४0 लाख रुपयांच्या योजनेचे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आलेले अंदाजपत्रक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे तांत्रिक मान्यतेसाठी महिनाभरापूर्वी सादर करण्यात आले. परंतु, या योजनेच्या अंदाजपत्रकास अद्याप तांत्रिक मान्यता प्राप्त झाली नाही. मजीप्राच्या तांत्रिक मान्यतेनंतर या योजनेला शासनाकडून मान्यता घ्यावी लागणार नाही. त्यामुळे अंदाजपत्रकात अडकलेली योजना केव्हा मार्गी लागणार आणि टंचाईग्रस्त ६४ गावांमधील ग्रामस्थांना पुरेसे पिण्याचे पाणी केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अंदाजपत्रकात अडकली ‘सुकळी’ योजना
By admin | Published: March 07, 2016 2:37 AM