अकोला : अलिकडच्या काळात विदर्भामध्ये उन्हाळी भुईमूग लागवड क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. यावर्षी जिल्ह्यात उन्हाळी भुईमूग लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी १७१३ हेक्टर क्षेत्रात भुईमूग लागवड करण्यात आली होती. मात्र, यंदाच्या हंगामात २५९३ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. जिल्ह्यात ८८० हेक्टर क्षेत्रात वाढ झाली असून, बार्शिटाकळी तालुक्यात सर्वाधिक लागवड झाली.
भुईमूग हे तीनही हंगामांमध्ये घेतले जाणारे महत्त्वाचे नगदी पीक असून, ते सर्वात जुने तेलबिया पीक आहे. उन्हाळी हंगामात भुईमुगाची लागवड अधिक फायदेशीर ठरते. उन्हाळी हंगामात भुईमुगाचे उत्पन्न खरीप हंगामापेक्षा दीड ते दोन पटीने जास्त येते. कारण योग्यवेळी पाणी पुरवठा होतो. शिवाय उन्हाळ्यात कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणावर असतो. सूर्यप्रकाश अधिक काळ उपलब्ध होत असतो. तसेच अलिकडच्या काळात तेलबिया व खाद्य तेलाच्या संदर्भातील परिस्थिती पाहता व वाढते बाजारभाव याचा सामूहिक विचार केला तर तेलबिया पिकांमध्ये भुईमुगाची लागवड आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरू शकते. यावर्षी पावसाळा चांगला झाल्यामुळे सिंचनासाठी पाणी बऱ्यापैकी उपलब्ध आहे. त्यामुळे पीकही जोमदार आहे. जिल्ह्यात बार्शिटाकळी तालुक्यात सर्वाधिक १२२४ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली. आता या पिकाला योग्य भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
--बॉक्स--
हंगामी भुईमूग क्षेत्र का घटले?
पावसाचा अनिश्चितपणा, जंगली जनावरांचा वाढता उपद्रव, उत्पादनात सतत होणारी घट तसेच इतर पिकांकरिता शेतकऱ्यांचा प्राधान्यक्रम या सर्व बाबींमुळे खरीप हंगामातील भुईमूग लागवड क्षेत्रात घट होत आहे.
--कोट--
गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने विहिरींना पुरेसे पाणी आहे. त्यामुळे पिकेही डौलाने उभी आहेत. निसर्गाची साथ मिळाल्यास उन्हाळी भुईमूग पिकातून नफा प्राप्त होईल.
शेषराव वानखेडे, शेतकरी, पातूर
--बॉक्स--
तालुकानिहाय लागवड
तालुका क्षेत्र (हेक्टर)
अकोट १००
तेल्हारा ३५
बाळापूर १९७
पातूर ४७३
अकोला ३८४
बार्शिटाकळी १२२४
मूर्तिजापूर १८०
एकूण २५९३