अकोला: पृथ्वी, सूर्य आणि शनी ग्रह मंगळवारी ९ जुलै रोजी एका रेषेत येत असल्याने सूर्यमालेतील सर्वांग सुंदर तथा वलयांकित असलेला शनी ग्रह रात्रभर आकाशात पाहता येणार आहे. आकाशप्रेमींना एक सुवर्णसंधी यानिमित्ताने प्राप्त झाली आहे.सूर्यास्ताच्या समयी आपला सूर्य पश्चिमेला अस्त होताना त्याच समयी पूर्व क्षितिजावर शनि ग्रहाचा उदय होईल. संधिप्रकाश कमी झाल्यानंतर शनी ग्रह बघता येईल. रात्र जसजशी वाढत जाईल, तसतसा हा ग्रह पूर्वेला वर-वर सरकत जाऊन मध्यरात्री १२.४० वाजता तो आकाश मध्याशी येणार आहे. त्यानंतर सूर्योदय होईपर्यंत हा ग्रह पश्चिम क्षितिजावर दिसणार आहे. दिवस पावसाचे असल्याने आकाशातील खुल्या जागेमधून त्याचे दर्शन घेता येईल. मंगळवारी सूर्य मिथुन राशीत २३ अंशावर तर शनी ग्रह धनू राशीत २३ अंशावरच राहील. रात्रीच्या सुरुवातीला पूर्व क्षितिजावर धनू राशी त्यावर वृश्चिक, तुला, कन्या, सिंह, कर्क ह्या राशी आयनिक वृत्तावर (सूर्य चंद्र आणि ग्रह यांचा भ्रमण मार्ग) दर्शन घेता येईल. याचबरोबर आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा असलेल्या गुरू ग्रहाचे दर्शन वृश्चिक राशी समूहात पहाटे तीनपर्यंत घेता येईल. प्रत्यक्षात आकाशातील ग्रह आपल्यापासून कोट्यवधी कि.मी. अंतरावर असून, जनमानसात या ग्रहाबद्दल असलेले गैरसमज दूर करून पृथ्वीला उपकारक असलेल्या सर्व ग्रहांशी नाते घट्ट करावे आणि सूर्य, पृथ्वी आणि शनी ग्रहाच्या अनोख्या युतीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे विश्वभारतीचे अध्यक्ष प्रभाकर दोड यांनी कळविले. (प्रतिनिधी)