अकोला: मागील २४ तासांत अकोला जिल्ह्याचे कमाल तापमान ४०.२ अशांवर पोहोचले आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सूर्य आग ओकू लागला असून, सोमवारच्या उन्हाने अकोलेकरांना याची जाणीव करू न दिली. उन्हाचा कडाका बघता टोप्या, शेले, गॉगल्सची मागणी वाढली.मार्च महिना संपताना कमाल तापमानात आणखी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ४०.२ अंश तापमानाची नोंद केली. तर अकोला शहरात हेच तापमान ३९.६ अंशावर होते. सोमवारी विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. तर काही भागात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली.मागील दोन दिवसांत उन्हाची तीव्रता अधिकच वाढली आहे. त्यामुळे बाहेर पडल्यांनतर अकोलेकरांना सोमवारी चांगलाच उन्हाचा सामना करावा लागला. त्यामुळे कामगारांसह अनेकांना काम करण्याचा उत्साह टिकवून ठेवणे कठीण होऊ लागले आहे. दुपारच्या वेळात बाहेर पडणाऱ्यांची संख्या सोमवारी काही प्रमाणात रोडावल्याची दिसली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऊन होते व पुढे यापेक्षा वाढणार असल्याने नागरिकांनी यापासून बचाव करण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.उकाड्याच्या त्रासातून सुटका करण्यासाठी नागरिक थंड पेये, आईस्क्रीम, कलिंगड आदींचा आधार घेत आहेत. दिवसभर उन्हाच्या झळा असह्य होत असतानाच रात्रीही आर्द्रता वाढलेली असल्याने घामाच्या धारा वाहत असतात. त्यातच उष्णतेचे अनेक विकार वाढतात. नागरिकांना ‘नको हा उन्हाळा’ म्हणायची वेळ येते. त्यातच दिवसेंदिवस पाण्याची टंचाईही भासू लागली आहे. शहरांमध्ये आता उन्हाळी सुटीसाठी तसेच लग्नसराईसाठी पाहुणे मंडळी येणार असल्याने असल्याने खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची मागणी वाढत आहे. दुर्गम तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांची तर पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. आताच उकाडा एवढा वाढू लागला असल्याने आणखी तीन महिने हा उकाडा कसा सहन करायचा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.