अकोला : जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्याचे तापमान ४२.९ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेला आहे. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सामान्यत: एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या झळा जाणवू लागतात. यंदा मार्च महिन्यापासून जिल्ह्याला उन्हाचा तडाखा बसत आहे. एकाच महिन्यात तीन वेळेस पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला होता. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात तापमानात जास्त वाढ झाली. बुधवारी जिल्ह्याचा पारा ४२.९ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. मंगळवारीही तेवढेच तापमान नोंदविले गेले होते. यंदाच्या वर्षी कडाक्याचा उन्हाळा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. कारण हवामान खात्याने येत्या दोन महिन्यांत भयंकर उष्णता वाढणार असल्याचा अंदाजही वर्तविला आहे. यानुसार, एप्रिल ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार आहे.
अकोला व यवतमाळचा पारा विदर्भात सर्वाधिक
विदर्भातील सर्वात उष्ण शहरात अकोला व यवतमाळचा समावेश झाला आहे. बुधवारी दोन्ही जिल्ह्यांचे तापमान ४२.९ अंश सेल्सिअस होते. येत्या काही दिवसांत उन्हाळा आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
उन्हाळ्याला आता सुरुवात झाली आहे. तापमान वाढणार असून, रात्रीच्या तापमानात काही अंशी घट झाली आहे.
- संजय अप्तुरकर, हवामान अभ्यासक