- प्रवीण खेते
अकोला : बहुप्रतीक्षेत असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये रुग्णसेवा सुरू करण्याची जबाबदारी अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने घेतली असून, येत्या आठ दिवसांत सुपर स्पेशालिटी अकोलेकरांच्या सेवेत असणार आहे. पहिल्या टप्प्यात येथील बाह्यरुग्ण विभाग सुरू केला जाणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी जगभीये यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मूळ उद्देश भरकटलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा विषय लोकमतने लावून धरला होता.
सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन सुमारे दोन वर्षांचा कालावधी झाला असून, पहिल्या टप्प्यातील पदनिर्मितीला वर्षभराचा कालावधी पूर्ण झाला आहे. दरम्यानच्या काळात रुग्णालयासाठी अत्यावश्यक असलेले वैद्यकीय उपकरणही रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र पदनिर्मिती न झाल्याने कोट्यवधी किमतीची वैद्यकीय उपकरणे धूळखात पडले आहेत. शिवाय, कोविड काळात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा मूळ उद्देशदेखील भरकटल्याचे चित्र दिसून आले. हा विषय ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर रुग्णालयाची इमारत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली. मात्र, कंत्राटी तत्त्वावरील पदभरतीची प्रक्रिया निविदा प्रक्रियेत अडकल्याची माहिती आहे. मात्र, ‘लोकमत’ने हा विषय लावून धरल्यानंतर अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने जबाबदारी घेत येत्या आठ दिवसांत सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू होणार असल्याची माहिती अधिष्ठातांनी दिली.
या विषयाची ओपीडी होणार सुरू
कार्डीओलॉजी
युरोलॉजी
न्युरोलॉजी
नेफ्रोलॉजी
लवकरच वैद्यकीय उपकरणांचेही इन्स्टाॅलेशन
धूळखात पडून असलेल्या कोट्यवधी किमतीच्या वैद्यकीय उपकरणांचे लवकरच इन्स्टाॅलेशन केले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. कार्डीओलॉजी, युरोलॉजी, न्युरोलॉजी आणि नेफ्रोलॉजी या विषयांच्या तज्ज्ञांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली असून, ते रुजू होताच वैद्यकीय उपकरणांचे इन्स्टाॅलेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे उपचाराच्या इतरही सुविधा लवकरच सुरू होणार आहे.
दहा सुपर स्पेशालिस्टची नियुक्ती
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाच विषयांसाठी प्रत्येकी एक निवासी डॉक्टर आणि प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कार्डीओलॉजी, युरोलॉजी, न्युरोलॉजी आणि नेफ्रोलॉजी आदी विषयांशी निगडित उपचाराला सुरुवात केली जाणार आहे.