अकोला : जुने शहरातील भांडपुरा चौकामध्ये एका विवाह समारंभादरम्यान झालेल्या वादानंतर पोलिसांनी गोळीबार केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक आणि जुने शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार डी. डी. वडमारे यांना मानवाधिकार आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश न्यायमूर्ती एस. आर. भन्नुरमठ यांनी मंगळवारी दिला आहे. जुने शहरातील तीन नागरिकांनी मानवाधिकार आयोगाकडे केलेल्या तक्रारीनंतर हा आदेश दिला आहे. भांडपुरा चौकात असलेल्या महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत १ जून २0१२ रोजी अलीयार खाँ मीया खाँ यांचा मुलगा वाजीद खाँ अलीयार खाँ याच्या विवाहाचा स्वागत समारंभ सुरू असताना रात्री ११ वाजतानंतरही कर्णकर्कश आवाजामध्ये डीजे वाजविण्यात येत होता. याचवेळी जुने शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार डी. डी. वडमारे रात्रीच्या गस्तीदरम्यान जात असताना त्यांनी डीजेचा आवाज कमी करण्याचा आदेश संबंधितांना दिला; मात्र विवाह समारंभातील काही पाहुण्यांनी पोलिसांसोबत वाद घालून आवाज कमी करण्यास स्पष्ट नकार दिला. याच कारणावरून पोलीस व स्वागत समारंभातील पाहुण्यांमध्ये चांगलाच वाद झाला. त्यानंतर पोलीस व वाद घाणार्या पाहुण्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. परिस्थिती गंभीर वळण घेत होती. हाणामारी सुरू असतानाच तत्कालीन ठाणेदार वडमारे यांच्या बंदुकीतील गोळी सुटली आणि ती वाजीद खॉँ मीया खाँ यांना लागली. यामध्ये ते जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले होते. या हाणामारीनंतर जुने शहर पोलिसांनी विविध कलमानुसार वाद घालणार्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर या प्रकरणी वाजीद खाँ अलीयार खाँ, साफिया आजाद खाँ व अलीयार खाँ मीया खाँ यांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे पोलिसांची तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने न्यायमूर्ती एस. आर. भन्नुरमठ यांच्या न्यायालयासमोर सुनावणी सुरू झाली असून, पुढील सुनावणीला पोलीस अधीक्षक व तत्कालीन ठाणेदार डी. डी. वडमारे यांना हजर राहण्याचा आदेश सोमवारी देण्यात आला.
पोलीस अधीक्षक, ठाणेदार हाजीर हो!
By admin | Published: August 12, 2015 1:36 AM