अनिल गवई/ खामगाव (बुलडाणा) : सफाई कामगारांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारावा, ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागातील सफाई कामगारांचे पुर्नसर्वेक्षण करण्याचे निर्देश राज्य शासनाने शुक्रवारी संबधित विभागाला दिले. त्याअनुषंगाने सोमवार, १0 ऑगस्टपासून राज्यात एकाचवेळी सफाई कामगारांचे पुर्नसर्वेक्षण केले जाणार आहे. हाताने मैला उचलणार्या सफाईकामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालण्यासोबतच या सफाई कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी अधिनियम २0१३ लागू केला आहे. २0१३ मध्ये यासाठी कालबध्द कार्यक्रम आयोजित करून सर्वेक्षणही करण्यात आले होते. त्यावेळी राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागात आजही अनेकजण हाताने मैला उचलत असल्याची वस्तुस्थिती समोर आली. दरम्यान, केंद्र शासनाच्या सन २0१३ च्या अधिनियमानुसार हाताने मैला उचलणार्या सफाई कामगारांच्या व्याखेमध्ये सुधारणा करण्यात आली. त्यामुळे या सफाई कामगारांचे पुर्नसर्वेक्षण करणे आणि इनसॅनिटरी लॅटरीनचे पूर्णपणे निर्मुलन करणे गरजेचे झाले आहे. यासाठीच हे पुर्नसर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती आहे. *पुर्नसर्वेक्षणासाठी एक महिन्यांचा कालावधी! नागरी आणि ग्रामीण भागातील हाताने मैला उचलणार्या सफाई कामगारांचे पुर्नसर्वेक्षण करण्याचे निर्देश देतानाच, शासनाकडून सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाला यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यामुळे येत्या १0 ऑगस्टपासून ९ सप्टेंबर २0१५ या महिनाभराच्या कालावधीत सफाई कामगारांचे पुर्नसर्वेक्षण करावे लागणार आहे.
*घरोघरी जाऊन करावे लागणार सर्वेक्षण!
२0११ च्या जनगणनेनुसार नागरी आणि ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात इनसॅनिटरी लॅटरिन आढळून आले आहे. इनसॅनिटरी लॅटरिनचे सॅनिटरी लॅटरिनमध्ये रुपांतर करण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे स्पष्ट निर्देशही राज्य शासनाने दिले आहेत. सॅनिटरी लॅटरिन्सचे पुर्णपणे निमुर्लन करण्याच्याही सूचना देण्यात आल्या असून याप्रकरणी दिरंगाई केल्यास संबधितांवर कारवाई करण्याचा इशाराही राज्य शासनाने दिला आहे.