पातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात अल्पभूधारक शेतकऱ्यांना स्वस्त दुकानांमार्फत जीवनावश्यक साहित्यांचा पुरवठा मोफत करण्याची मागणी बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी नेते बळिराम सिरस्कार यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सततची नापिकी आणि ग्रामीण भागामध्ये कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नसल्याने उदरनिर्वाहासाठी रोजगाराच्या शोधात महानगरांमध्ये काम करण्यासाठी गेलेले युवक लॉकडाऊनमुळे घरी परतत आहेत. त्यांना गावात कोणत्याही प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना रेशन दुकानाच्या माध्यमातून मोफत आवश्यक साहित्याचा पुरवठा करावा, अशी मागणी माजी आमदार बळिराम सिरस्कार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.