मूर्तिजापूर : लॉकडाऊनपासून तालुक्यातील संपूर्ण शाळा बंद होत्या. दरम्यान, अलीकडे शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून विद्यार्थ्यांना नियमित शालेय पोषण आहार पुरविण्याचे नियोजनाचाही समावेश आहे. परंतू विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारातील धान्य अत्यंत निकृष्ट व माती सिमेंट मिश्रित निघाल्याची धक्कादायक माहिती बुधवारी समोर आली आहे.
शालेय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यातील शालेय पोषण आहाराची महत्त्वाची योजना आतापर्यंत मुख्याध्यापकांनी व शालेय पोषण अधीक्षकांसाठी सध्या आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरत आहे, गत १ जानेवारी दरम्यान शालेय पोषण आहाराचा कोटा पुरविण्यात आला आहे. परंतु माना रेल्वे स्टेशनवरील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करीत असताना, त्यात चक्क सिमेंट मिश्रित (भेसळयुक्त) तांदूळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. शालेय पोषण आहाराचे वाटप करते वेळी मुख्याध्यापकाच्या लक्षात आल्याने त्यांनी, ही बाब शालेय पोषण आहार अधीक्षक पंचायत समिती मूर्तिजापूर यांच्या लगेच लक्षात आणून दिली. त्यांनीही त्या बदल्यात दुसरे तांदूळ पाठविण्याचेही कबूल केले. तरी विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारा पोषण आहार निकृष्ट व भेसळयुक्त येतोच कसा, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. भारतीय खाद्य निगम कंपनीकडून मिळणारा शालेय पोषण आहारातील खाद्यपदार्थ आशुतोष ट्रेडर्स, अकोला या पुरवठादारा मार्फत पुरविले गेले आहेत. भेसळयुक्त धान्य पुरवठा करून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या पुरवठादारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शालेय पोषण आहाराच्या नावाखाली प्रचंड उधळपट्टी होत असून योग्य तो पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. तांदूळ व कडधान्य वगळता हिरव्या पालेभाज्या व इतर भाज्यांचा रोज जेवणात समावेश असावा. यासाठी राज्यामध्ये शालेय पोषण आहार ही योजना इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येते. विद्यार्थ्यांमागे मिळणारे पहिली ते पाचवी ४ रुपये १३ पैसे, सहावी ते आठवी ६ रुपये ५८ पैसे हे थेट मुख्याध्यापकाच्या घशात जात असल्याने, त्यात शालेय पोषण आहार संबधित अधिकाऱ्यांना मोठे कमिशन असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हिरव्या पालेभाज्या, बटाटे, कोबी यासारख्या भाज्यांचा शालेय पोषण आहाराच्या माध्यान्ह भोजनात समावेश असणे सक्तीचे असताना या भाज्यांचा आहारात अनेक शाळांमध्ये वापर होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. एवढेच नव्हे तर आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना (बुधवारी) केळी, अंडी, बिस्किटे देण्याची सक्ती असताना तालुक्यातील अनेक शाळेत या आहाराचे वाटपच होत नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यात मराठी व उर्दू माध्यमाच्या (इंग्रजी शाळा वगळून) एकूण १९३ शाळा असून यामधील ७ शाळा विना अनुदानित आहेत. या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात येत नाही.
विद्यार्थी म्हणतात, बिस्किटे, अंडी, केळी मिळतच नाहीत
या संदर्भात तालुक्यातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना विचारणा केली असता आमच्या शाळेत आम्ही कधी बिस्किटे, अंडी, केळी बघितलीच नाहीत. एखाद्या वेळेस प्रत्येकी चार बिस्किटे मिळतात. हिरव्या भाजीपाल्याचा समावेशही अधूनमधून असतो.
माना येथील शाळेतील शालेय पोषण आहाराच्या तांदळाचे कट्टे सिमेंट मिश्रित (भेसळयुक्त) असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले, सदर भेसळयुक्त तांदूळ बदलून देण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
मनोज गवई, शालेय पोषण आहार अधीक्षक, पं. स. मूर्तिजापूर