अकोला: केरोसिन विक्रीचा परवाना दिलेल्या महिला बचतगटाचा पुरवठा विभागाकडे अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्या मूर्तिजापूर तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी राजेंद्र राठोड याला गुरुवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. मूर्तिजापूर तालुक्यातील कवळा गावातील बचतगट चालविणार्या महिला तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा गावात महिला बचतगट आहे. या बचतगटाला पुरवठा विभागाकडून केरोसिन विक्रीचा परवाना मिळालेला आहे. मूर्तिजापूर येथील पुरवठा अधिकारी राजेंद्र राठोड याने बचतगटाने केलेल्या केरोसिन विक्रीबाबत निरीक्षण केले. निरीक्षणादरम्यान बचतगटाकडे केरोसिन वाटपाचा लेखाजोखा नव्हता. त्यामुळे राठोड याने जिल्हा पुरवठा विभागाकडे बचतगटाची तक्रार करण्याची तक्रारदारास धमकी दिली. बचतगटाने तक्रार न करण्याबाबत त्याची मनधरणी केली आणि पुरवठा विभागाकडे बचतगटाच्या केरोसिन वाटपाचा अनुकूल अहवाल पाठविण्याची विनंती केली. पुरवठा अधिकारी राजेंद्र राठोड याने विषय ताणून धरला आणि बचतगटाचा अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. मागणीनुसार, गुरुवारी पैसे देण्याचे ठरले. राजेंद्र राठोड याने तक्रारदार महिलेला दोन हजार रुपये घेऊन मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयात बोलाविले. त्यापूर्वी महिला तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयात सापळा रचला. महिला तक्रारदार पैसे घेऊन आल्यावर पुरवठा अधिकार्याला संशय आला. त्यामुळे त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही; परंतु लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुरवठा अधिकार्याने लाचेची मागणी केल्यामुळे त्याला अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल.
पुरवठा निरीक्षक गजाआड
By admin | Published: December 25, 2015 3:19 AM