आशिष गावंडे, अकोला: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणकर्त्या मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजातर्फे ८ सप्टेंबर रोजी जिल्हा व शहर बंदची हाक देण्यात आल्यानंतर बुधवारी रात्री सकल मराठा व मुस्लिम समाजाच्या समन्वय बैठकीत मराठ्यांच्या बंदला मुस्लिम समाजाने जाहीर पाठिंबा दिला. यावेळी धर्मगुरूंनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाभरातील मुस्लिम समुदायाला केले.
सकल मराठा समाजाच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी जिल्हा व शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदला मुस्लिम समाजाने पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आयोजकांच्या वतीने काँग्रेसचे मनपातील माजी विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांना दिल्यानंतर पठाण यांनी बुधवारी रात्री लक्कडगंज परिसरात सकल मराठा समाज व मुस्लिम समुदायाच्या समन्वय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मुस्लिम धर्मगुरूंनी व समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी सकल मराठ्यांच्या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.
या बैठकीत मुफ्ती ए आज़म, मुफ्ती गुलाम मुस्तफा, सुन्नत जमातचे अध्यक्ष हाजी मुदाम खान, शम्स तबरेज खान, कच्छी मेमन जमातचे जावेद जाकेरिया , जमाते इस्लामी हिंदचे अध्यक्ष डॉ. उरूज मुदस्सिर, मोहम्मद यूनुस, अनीस लखानी, जावेद खान, ट्रांसपोर्ट एसोसिएशनचे अध्यक्ष हाजी मजार खान, फ्रूट मर्चेंट एसोसिएशनचे हाजी मुजाहिद खान, केरोसिन संगटनेचे अध्यक्ष यासीन भाई, मुस्लिम राष्ट्रीय संघाचे जिल्हाध्यक्ष तनवीर खान, महानगर अध्यक्ष जावेद खान, दाऊदी बोहरा जमातचे शब्बीर शामलक, मुस्तफा हिरणी, मिल्लत एज्युकेशन सोसाइटीचे अध्यक्ष सरफराज खान सर यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम समुदायातील उलेमा, व्यापारी उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांनी जात-पात, धर्मभेद केला नाही!
रयतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जात-पात व धर्मभेद केला नसल्याचे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी यावेळी सांगितले. सकल मराठा समाजाच्या वतीने समन्वयक अशोकराव पाटोकार, कांग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, काँग्रेस महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत पाटिल, डॉ. अभय पाटिल, शिवसेना नेते माजी आमदार दाळू गुरुजी, अविनाश देशमुख, डॉ. अमोल रावणकार, प्रशांत गावंडे, माजी नगरसेवक पंकज गावंडे, डॉ. सुधीर ढोने उपस्थित होते.
राजकीय पक्षांनी दिला पाठिंबा
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, महानगराध्यक्ष विजय देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, शिवसेना (शिंदे गट)च्या वतीने महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी बंदला पाठिंबा दिला आहे.