बड्या माफियाची मध्यस्थी
पोलिसांचे पथक खाली हात परतले
अकोला : सिंधी कॅम्पमध्ये पान मसाला नावाने दुकान चालविणाऱ्या एका दुकानात लाखोंचा गुटखा असल्याच्या माहितीवरून विशेष पथकाने शुक्रवारी सकाळीच छापा टाकला. मात्र, एका बड्या गुटखामाफियाने यामध्ये मध्यस्थी केल्यानंतर पोलिसांनी जागेवरच ‘अर्थ’कारण आटपून गुटखा जप्त न करताच पोलीस पथक खाली हात परतल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
सिंधी कॅम्पमधील चर्चच्या भिंतीला लागून असलेल्या एका पान मसाला दुकानात गुटख्याचा मोठा साठा असल्याच्या माहितीवरून पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी छापा टाकला. या दुकानात व त्याच्या गोदामात पोलिसांनी तपासणी केली. लाखोंचा गुटखा साठा त्यांना या ठिकाणी आढळला. मात्र, कारवाई न करण्यासाठी एका बड्या गुटखामाफियाने पथकावर दबाव आणला. त्यानंतरही पथकाने गुटखा जप्तीसाठी पुढाकार घेताच बडा गुटखामाफिया व सनी नामक व्यक्तीने पोलिसांना थेट ‘ऑफर’ दिली. पथकानेही क्षणाचाही विलंब न करता ऑफर स्वीकारत त्या ठिकाणावरून काढता पाय घेतला. या दुकानात व गोदामात काहीच नसल्याचे सांगत पोलिसांनी कारवाई दडपली. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा साठा असतानाही पोलीस खाली हात परतल्याने या प्रकरणाची चर्चा पोलीस वर्तुळात जोरदार सुरू आहे. हे प्रकरण पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
पथकात खासगी लोकांचा भरणा
जिल्हास्तरावर छापेमारी व कारवायांसाठी धडाका लावणाऱ्या या पथकात काही खासगी इसम अधिक प्रमाणात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे पथकातील पोलीस कर्मचारी व खासगी इसम यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. त्यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पोलिसांच्या खाकीला डाग लागण्याची शक्यता आहे. छापेमारीचे कामही खासगी इसम करीत असल्याने त्यांच्यात व नियुक्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.