अकोला : केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्रातील ३४० गावांत १ ते ३१ आॅगस्टदरम्यान स्वच्छतेसंदर्भात सर्वेक्षण होणार आहे. सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या राज्यातील जिल्ह्यांना २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी गौरविण्यात येणार आहे.स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण २०१८ मध्ये देशभरातील ६९८ जिल्हे सहभागी असून, प्रत्येक जिल्ह्यामधून १० गावे याप्रमाणे ६ हजार ९८० गावांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील ३४० गावांमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे, तसेच देशभरातील एकूण ३४ हजार ९०० सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये सरकारी शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचायत भवन, आठवडी बाजार, धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणांतर्गत ग्रामीण भागातील ५० लाख नागरिकांची स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष तसेच आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविली जाईल.गावांचे सरपंच, स्वच्छताग्रही, ग्रामपंचायत सदस्य, देखरेख समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. यासोबतच आतापर्यंत बांधलेल्या आणि वापरात असलेल्या शौचालयांची माहिती घेतली जाईल.
३४० गावांत होणार स्वच्छ सर्वेक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 5:16 AM