मूर्तिजापूर : तालुक्यातील गावातील ४४३ हेक्टर शेतातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा आणि ३४ राहत्या घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाचा आहे. नुकसानग्रस्त शेतीचा व घरांचा तत्काळ सर्व्हे करून मदत देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी आणि जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह मूर्तिजापूर तालुक्यातील बपोरी, मंदुरा शेलुबाजार, कवठा, बोर्टा, गुंजवाडा, खापरवाडा व इतर गावांतील नुकसान झालेल्या शेतीचे व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. यावेळी नुकसान झालेल्या पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मुगाची रोपे काळी पडून जळलेल्या अवस्थेत दिसून आले. शेतकऱ्यांना सर्व्हेबाबत विचारणा केली असता तलाठी, पटवारी, कृषी अधिकारी सर्व्हेला आले नसल्याचे सांगण्यात आले. अतिवृष्टीग्रस्तांच्या बाबतीत शासकीय कर्मचारी आणि शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला.
--------------------------
‘हेक्टरी २५ हजारांची मदत द्या!’
नुकसान झालेल्या शेतीचे आणि घरांचे सर्वेक्षण करून त्वरित हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. न दिल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका आणि जिल्हा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी दिला. या दौऱ्यात जिल्हा परिषद कृषी सभापती पंजाबराव वडाळ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड, सदस्य संजय नाईक, मोहन रोकडे, बाळासाहेब खंडारे, सचिन शिराळे, पुरषोत्तम अहीर, विजय तायडे, संजय तायडे, पंडित वाघमारे, राहुल महाजन, जीवन ढोकणे, सुनील सरदार, पंचायत समिती सदस्य सुनील तामखाने, पं. स. सदस्य नकुल काटे, पं. स. सदस्य सचिन दिवनाले, शशिकांत सरोदे, राम हिंगणकर, संजय वानखडे, नगरसेवक वैभव यादव, सुनील सरदार, सतीश गवई, किशोर राऊत, संतोष गणेशे, रंजित शिरसाट, संकेत कोल्हे, महेंद्र तायडे, रोशन वानखडे, उमेश तायडे, श्रीकृष्ण सरदार, राजू वर्घट, प्रमोद आंबेकर, सुधाकर वऱ्हाडे, राजू वाघमारे, बाळू तेलमोरे आदी सहभागी झाले होते.