अकोला : अकोला महापालिकेअंतर्गत फेरीवाला धोरण सुरू करण्यासाठी मनपाने मोबाईल अॅपद्वारे सर्वेक्षण सुरू केले आहे . या सर्वेक्षणाची प्रक्रीया गुरूवारी दि.७ मार्चपासून सुरू झाली आहे. अकोलेकरांनी या मोबाईल अॅपचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी केले आहे.महानगरपालिकेच्या दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान, यांच्या माध्यमातून ठाणे येथील एजन्सी नेमण्यात आली असून लवकरच अकोला शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी काही नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या रत्यावर पथारी टाकून आणि हातगाड्या लावून विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या लघु व्यवसायीकांनी सुरू असलेला मोबाईल नंबर जोडावा. विशेष म्हणजे हा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. तसेच फेरीवाला/विक्रेता हा अकोला शहराचा रहिवासी असणे गरजेचे आहे. सर्वेक्षणाच्या वेळी फेरीवालाचे वय १४ वर्षार्पेक्षा कमी असू नये. त्यांचेकडे मनपाच्या बाजार विभागामार्फत नेमलेल्या यंत्रणेकडून रस्त्यावर विक्री करण्यासाठी आकारण्यात आलेल्या २०१४ पूर्वीच्या शुल्काची पावती, रेशनकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र व विधवा अथवा परित्यक्ता असल्यास त्यासबंधित पुरावे असणे आवश्यक आहे. सर्वेक्षणाअंती या फेरीवाल्यांसाठी महानगर पालिका अकोलाच्या वतीने आराखडा तयार करून त्यांना मुलभूत सुविधा व त्याची क्षमता बांधणी करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी फेरीवाला यांनी अॅपचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी केले आहे.