आशिष गावंडे। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गायीच्या दुधापासून तयार केलेल्या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रांमध्ये विविध ठिकाणी ‘मदर डेअरी’ उभारल्या जाणार आहेत. त्या पृष्ठभूमीवर मदर फुट्र अँन्ड व्हिजिटेबल प्रा.लि.च्या प्रतिनिधीने शहरात सर्व्हेची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरांमध्ये ठिकठिकाणी ‘मदर डेअरी’ प्रकल्प स्थापित करण्याचे पशुसंवर्धन विभागाला निर्देश दिले आहेत. केंद्र शासनाच्या अखत्यारित असणार्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या निर्देशानुसार मदर फ्रुट अँन्ड व्हिजिटेबल प्रा.लि.च्या प्रतिनिधींनी विदर्भ व मराठवाड्यातील प्रमुख शहरांमध्ये सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. पूर्व विदर्भात ‘मदर डेअरी’ उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, नागपूर, वर्धा शहरात गायीच्या दुधाचे संकलन व विक्रीदेखील सुरू झाली आहे. अकोला शहरातसुद्धा डेअरी उभारण्याच्या अनुषंगाने मदर फुट्र अँन्ड व्हिजिटेबल प्रा.लि.च्या प्रतिनिधीने शहराच्या विविध भागात सर्व्हेची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती आहे. डेअरीसाठी महापालिकांचे संकुल तसेच मनपा शाळांच्या इमारतींना प्राधान्य देण्यात आले आहे.
सेवानवृत्त सैनिकांना प्राधान्यशहरात विविध ठिकाणी ‘मदर डेअरी’च्या माध्यमातून दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली जाणार आहे. त्यासाठी सेवानवृत्त सैनिकांना प्राधान्य देण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकल्पांतर्गत डेअरी उभारण्यासाठी शासनाकडून किमान १३ लाख रुपये खर्च केले जातील. कोल्ड स्टोअरेजसह सर्व सुविधांचा त्यामध्ये समावेश राहणार आहे. डेअरी चालवून संबंधिताला महिन्याकाठी किमान १५ हजारांचे उत्पन्न प्राप्त करणे अनिवार्य आहे.
मनपा आयुक्तांना दिले निर्देशप्रशासकीय पातळीवर पूर्व, पश्चिम विदर्भातील १४ जिल्ह्यांमध्ये ‘मदर डेअरी’च्या गठनासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये दुधाचे संकलन व विक्री सुरू झाली आहे. यासंदर्भात डिसेंबर महिन्यात नागपूर येथे खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला असता अकोला शहराचा उल्लेख झाला. त्यावेळी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांना शहरात डेअरीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली.
स्थानिक स्तरावर शेतकर्यांकडून गायीचे दूध खरेदी करणे व त्याची विक्री करण्याचा ‘मदर डेअरी’अंतर्गत समावेश राहील. यामध्ये गायीच्या दुधापासून तयार दुग्धजन्य पदार्थांची विक्री करता येणार आहे. शहरातील ३६ जागांची पाहणी करण्यात आली आहे. त्यामध्ये वाढदेखील होऊ शकते. -जितेंद्र वाघ, आयुक्त मनपा