अकोला : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयांच्या निर्मितीसाठी प्रत्येक गावातील लाभार्थींचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यासाठी ३८०० शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात नव्याने शौचालय बांधण्यासाठी कालमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर शौचालय निर्मितीसाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. त्या सर्वेक्षणात किती लाभार्थी शौचालय बांधण्यास तयार आहेत, त्याची यादी करावी, लाभार्थीनिहाय निर्माण गट जोडण्यात यावे, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांना फॉर्म देऊन युनियन बँकेकडून कर्ज घेऊन पुढील कार्यवाही करावी, ग्रामसेवकांकडे २५ मेपर्यंत फॉर्म देण्याचेही निर्देश देण्यात आले. शौचालय बांधण्यास तयार नसलेल्या लाभार्थींना नरेगामधून बांधकाम करून द्यावे, त्यासाठी रोजगार सेवक यांच्यासमवेत सर्वांनीच समन्वय ठेवून काम करावे, १० जूनपर्यंत ३८०० शौचालयांची निर्मिती कोणत्याही परिस्थितीत करावी, असेही निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.