कारंजा लाड : जिल्हय़ात खळबळ उडवून देणार्या कारंजा गुरुमंदिर देणगी अपहार प्रकरणामधील आरोपींना या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत विश्वस्त पदावरू न निलंबित करण्याची मागणी सहायक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारकर्त्यांनी सोमवारी केली. या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांच्या न्यायालयात मंगळवार २ जून रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. देशभर प्रसिद्ध असलेल्या कारंजा येथील गुरुमंदिराच्या सात विश्वस्तांसह लेखापरीक्षक आणि सनदी लेखापाल मिळून संस्थानला देणगीच्या स्वरूपात मिळालेल्या रकमेतून विविध प्रकारे ३७ कोटींच्यावर रकमेचा अपहार केल्याची तक्रार कारंजा येथीलच शेखर कान्नव, अनंत गजानन आठल्ये, प्रमोद नारायण दहीहांडेकर आणि गजानन जोशी या चौघांनी रविवारी कारंजा पोलिसांत दाखल केल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संस्थानच्या नावे असलेले बँकेचे पासबुक, बँक स्टेटमेंट, कॅशबुक, व्हाऊचर बुक आदी महत्त्वपूर्ण दस्तऐवज यांच्या ताब्यात आहे. हे आरोपी या दस्तऐवजामध्ये पुन्हा काही गडबड करण्याची शक्यता आहे, तसेच मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान जडजवाहिर गायब होण्याची भीती असल्याची शंका व्यक्त करीत विश्वस्तांना प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंंत पदावरून निलंबित करण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी सोमवारी सहायक धर्मादाय आयुक्त अमरावती यांच्याकडे केली. त्यांच्या तक्रारीवर २ जून रोजी सुनावणी ठेवण्यात आल्याची माहिती पहिल्या क्रमांकाचे तक्रारकर्ते शेखर कान्नव यांनी दिली.
गुरुमंदिराच्या विश्वस्तांना चौकशीपर्यंत निलंबित करा!
By admin | Published: June 02, 2015 2:13 AM