अकोला : प्रतिबंधीत क्षेत्रात जीव धोक्यात घालून पोलीस ड्युटी करीत आहेत. आत बाहेर करणाऱ्या विरुद्ध पोलीस कारवाई करीत आहेत. वेळप्रसंगी त्यांना बळाचाही वापर करावा लागत असून अशाच एका प्रकरणात पोलीस कर्मचारी संदीप तांदुळकर याना निलंबित केल्यानंतर 8 दिवसांच्या आतच पुन्हा रुजू करून घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. सध्या अकोल्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना दिवसाला रोज नव्या प्रतिबंधित क्षेत्राचे भर पडत आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांना बाहेर येऊ न देण्यासाठी पोलिसांचे पाँईट लावण्यात आले आहेत. बैदपुरा या प्रतिबंधित क्षेत्रातील एक महिला आणि तिचा मुलगा रस्त्याने जात असताना रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप तांदूळकर यांनी त्यांना हटकले. यावेळी आरसीपी पोलिसांनीही त्या लोकांना मज्जाव केला. यावेळी सदर महिलेवर पोलिसाने काठी उगारल्याचा आक्षेप घेण्यात आला. पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणाची तक्रार गेल्याने त्यांनी थेट पोलीस कर्मचारी तांदूळकर यांना निलंबित केले. आधीच रामदास पेठ पोलीस ठाण्यात कोरोना पोजिटिव्ह तीन पोलीस निघाल्याने या पोलीस ठाण्यातील पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण असताना याच पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाºयाला निलंबित करण्यात आल्याने खळबळ माजली होती. मात्र पोलीस अधीक्षक गावकर यांनी पोलीस कर्मचारी संदीप यास शुक्रवारी पुन्हा रुजू होण्याचा आदेश दिला.
निलंबित पोलीस कर्मचारी पुन्हा रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 3:42 PM