अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने ५ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाल्यानंतर ३८ दिवसांनी त्यांच्या मुलाने वडिलांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला नसून त्यांचा घातपात झाल्याची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पुरलेला मृतदेह तब्बल ३८ दिवसांनंतर बाहेर काढला. त्यानंतर कब्रस्तानमध्येच उत्तरिय तपासणी करण्यात आली असून, शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या प्रकरणाचा खुलासा होणार आहे.जुने शहर पोलीस ठाण्यांतर्गत रहिवासी असलेल्या मुस्ताकबाबा यांचा ५ फेब्रुवारी रोजी हृदयविकारामुळे मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्यांच्यावर महान येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले होते; मात्र मृत्यूनंतर आठ दिवसांनी त्यांचा मुलगा सरफराज अली यास माहिती मिळाली की, त्यांच्या वडिलांचा मृत्यू हृदयविकाराने झाला नसून, त्यांच्या वडिलांना मारण्याचा कट रचल्या जात होता, तर अन्नात विष देऊन मुस्ताकबाबा यांना मारण्यात आले आहे. याप्रकरणी मृताचा मुलगा यांनी जुने शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाचा योग्य तो तपास करण्यात यावा, अशी मागणी पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्याकडे केली. तर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गांवकर यांनी या प्रकरणाचा योग्य तो तपास करण्यासाठी पुन्हा शवविच्छेदन करण्यात यावे, असे आदेश दिले. त्यानंतर हा पुरलेला मृतदेह काढून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून, आता त्याचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील सत्यता समोर येणार आहे.