नासीर शेख
खेट्री : पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत पिंपळखुटा शेत शिवारात झालेल्या दोन बिबट्यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरण थंडबस्त्यात टाकून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. पिंपळखुटा परिसरात लोखंडी विद्युत खांबाचा शॉक लागून दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना २४ डिसेंबर, २०२० रोजीच्या सकाळी ११ वाजता उघडकीस आली होती. विद्युत खंबाच्या बाजूला मुंगूसही मृतावस्थेत आढळून आल्याने, मुंगसाची शिकार करण्यासाठी बिबटे शेतात घुसल्याचा अंदाज गावकऱ्यांनी वर्तविला होता, परंतु त्यावेळी एक बिबटा फुगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने दोन्ही बिबट्यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याचे समोर आले होते. बिबट्यांचा मृत्यू शॉक लागूनच झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला होता. बिबट्यांचा उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतर सर्व प्रकरण समोर येईल, अशी आशा ग्रामस्थांना होती, परंतु तीन महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, अद्यापही बिबट्यांचा मृत्यू प्रकरणाची चौकशी करणार आली नाही, त्यामुळे सखोल चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
बॉक्स
बिबट्यांच्या मृत्यूमध्ये पाच तासांचा अंतर
विद्युत खांबाचा शॉक लागून दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याबाबतचा आलेगाव वनविभागाने पंचनामा केला असता, एक बिबटा फुगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने दोन्ही बिबट्यांच्या मृत्यूमध्ये चार ते पाच तासांचा अंतर असल्याचे समोर आले होते.
बॉक्स
आलेगाव वनविभागाचा तपास शून्य
दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच आलेगाव वनविभागानी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि नंतर कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही, त्यामुळे वनविभागाचा तपास शून्य असल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
महावितरण विभागाने झटकले हात
बिबट्यांचा मृत्यू शॉक लागून झाल्याची माहिती मिळताच, सस्ती वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता यांनीही आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेऊन, विद्युत खांबा जवळ मृतावस्थेत बिबटे सापडले, त्या विद्युत खांबाला हात लावून बिबट्यांचा मृत्यू शॉक लागून झाला नसल्याचे स्पष्ट करून हात झटकले होते.
प्रतिक्रिया
बिबट्यांच्या मृत्युबाबतचा उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाला नाही, तसेच चौकशी सुरू आहे. चौकशीअंती पुढील कारवाई करण्यात येईल.
- सतीश नालिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी आलेगाव