अकोला : अत्यंत कमी पाण्यावर हमखास उत्पादन देणारी शेती म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. ही रेशीम शेती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सांगड रेशीम कोष उत्पादनाला मिळाल्यामुळे शेतकरी रेशीम उत्पादनाकडे वळला आहे. जिल्ह्यात वर्षभरात ४४९ शेतकऱ्यांनी ४५० हेक्टरवर २४ हजार ३७२ मेट्रिक टन कोष उत्पादन घेतले. यावर्षी या संख्येत वाढ होणार आहे.
राज्यात रेशीम शेतीचा प्रारंभ जवळपास पाच दशकांपूर्वी झाला. आजघडीला जवळपास २८ जिल्ह्यांमध्ये कमी- अधिक प्रमाणावर रेशीम शेती केली जाते. लहानात लहान शेतकरीदेखील ही शेती अत्यंत कमी पाण्यावर करता येत असल्याने त्याकडे वळला आहे. या शेतीचे महत्त्व विशेषकरून ग्रामीण भागातील महिलांना कळल्याने त्या या शेतीकडे वळल्या आहेत. रेशीम निर्मितीसाठी तुतीची लागवड करून त्यातून निघणाऱ्या अळींचे संगोपन, तसेच त्यांचे संरक्षण हे सोप्या पद्धतीने केले जाते. केवळ तापमान वाढीचा आणि कमी होण्याचे तंत्र सांभाळल्यास ही शेती परवडणारी असून, जिल्ह्यात ही शेती जवळपास ४५० एकर क्षेत्रात आहे. जिल्ह्यात सिल्क समग्र व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो. श्वाश्वत उत्पन्नाचा स्रोत म्हणून जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहे. यावर्षी ५५० एकरात रेशीम उत्पादन घेण्यात येणार आहे.
--बॉक्स--
पश्चिम विदर्भात हवे कोष खरेदी केंद्र
रेशीम कोषनिर्मितीनंतर ते कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना आधी कर्नाटक राज्यातील रामनगर येथे जावे लागत होते. त्यानंतर जालन्यातील कृषी बाजार समितीत महाराष्ट्रातील पहिले रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू केले. मात्र, जवळपास खरेदी केंद्र नसल्याने पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना जालना गाठावे लागते. त्यामुळे पश्चिम विदर्भात कोष खरेदी केंद्र गरजेचे आहे.
--बॉक्स--
जिल्ह्यात नवीन नोंदणी
५५०
मागील वर्षी झालेली तुती लागवड
४५० एकर
मागील वर्षी झालेले कोष उत्पादन
२४,३७२ मे. टन
--कोट--
जिल्ह्यातील शेतकरी स्वयंरोजगार म्हणून रेशीम शेतीकडे वळत आहे. दुष्काळी परिस्थितीत रेशीम उद्योग सर्वांत चांगला आहे. श्वाश्वत पिकाची हमी असल्याने रेशीम शेती दर महिन्याला पगारदार व्यक्तीसारखे उत्पन्न देते. यावर्षी ५५० एकरात लागवड होणार आहे.
-ए.एल. मोरे, प्रभारी रेशीम विकास अधिकारी
--कोट--
मागील १५ वर्षांपासून रेशीम शेती करीत आहे. या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळत असून, दरवर्षी अडीच लाख रुपये नफा होतो. सध्या साडेचार एकरात उत्पादन घेत आहे. दर महिन्याला ४ क्विंटल माल निघतो.
-देवराव लाहोळे, रेशीम उत्पादक शेतकरी, अंबाशी