सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा कुख्यात दहशतवादी शोपिया जिल्हय़ातील फुलवाणी व अवनिरा या गावात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान लष्कराद्वारे राबविण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या चकमकीत एका दहशतवाद्याचा पाठलाग करताना सुमेध गवई यांच्यावर गोळय़ा झाडण्यात आल्या आणि मानेत, मांडीवर व छातीत गोळी लागल्याने त्यांना वीरमरण आले. सुमेधसोबत चकमकीत सहभागी असलेल्या नायब सुभेदार बाळासाहेब खराटे यांनी हा थरार सोमवारी कथन केला.हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कुख्यात दहशतवादी यासीन इटू फुलवाणी व अवनिरा गावात असल्याची माहिती लष्कराच्या छावणीला मिळाली. या माहितीच्या आधारे लष्कराच्या अधिकार्यांनी या गावात तपासणी करून ऑपरेशन राबविले. मात्र, यावेळी यासीन इटू हा चकमा देऊन फरार होण्यात यशस्वी झाला. लष्कराच्या अधिकार्यांसह सुमेध गवई यांनी यासीन इटूचा पाठलाग केला. पाठलाग करीत असतानाच याच परिसरातील एका गावातील ग्रामस्थांनी सैन्यातील जवानांवर प्रचंड दगडफेक केली. या दगडफेकीनंतर लष्कर व दहशवाद्यांमध्ये गोळीबार झाला. जवानांवर एकीकडून ग्रामस्थांची दगडफेक सुरू होती, तर दुसरीकडून दहशतवाद्यांचा गोळीबार सुरू होता. मध्येच अडकलेल्या जवानांपैकी वीरपुत्र सुमेध गवई यांच्यावर चकमकीत दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने सुमेधच्या मानेत पहिली गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला, अशा अवस्थेत तो खाली कोसळताच दहशतवाद्यांनी वीरपुत्र सुमेधच्या छातीवर आणि पायावर गोळय़ा झाडल्याने त्यांना जागेवरच वीरमरण आले. सुमेध गवई यांच्यासोबत चकमकीत सहभागी असलेल्या नायब सुभेदार बाळासाहेब खराटे यांनी ही आपबिती कथन केली असून, सिनेमातील प्रसंगालाही लाजवेल, असा थरार त्यांनी अनुभवल्याचे सोमवारी अंतिम संस्काराच्या वेळी सांगितले.
दोन्ही गावे अतिसंवेदनशीलकाश्मीरमध्ये असलेले फुलवाणी आणि अवनिरा ही दोन्ही गावे प्रचंड अतिसंवेदनशील असल्याची माहिती सैन्यातील अधिकार्यांनी दिली. या दोन्ही गावात जवानांवर दगडफेक होत असल्याचेही त्यांनी सांगितले. चीन व पाकिस्तान या दोन्ही देशांच्या विघातक कारवायांसाठी ही दोन्ही गावे सुलभ असल्याने या दोन गावांतून नेहमीच अशाप्रकारच्या कारवाया करण्यात येत असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
बुलेटप्रूफ वाहनातून गस्तअवनिरा व फुलवाणी या दोन गावांमध्ये बुलेटप्रूफ वाहनांमधूनच लष्कराचे जवान गस्त घालतात, अशी माहिती नायब सुभेदार बाळासाहेब यांनी दिली. या दोन गावांत दहशतवादी घुसत असल्याने लष्करांच्या जवानांना मोठा धोका आहे. त्यामुळेच बुलेटप्रूफ वाहनातून गस्त घालण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.