अकोट : स्थानिक शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 'ज्ञानेश्वरी' परीक्षेत घवघवीत यश संपादन करताना रोख रक्कम व पुरस्कार प्राप्त केला.
गुरूवर्य मामासाहेब दांडेकर राज्यस्तरीय ज्ञानेश्वरी परीक्षा १९ जानेवारी २०२० ला घेण्यात आली होती. या परीक्षेत एकूण ९० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेत प्रणव सावरकर याला १०,००० हजार रुपयाचे रोख व तन्वी अढाऊ हिला १०,००० हजार रुपये रोख बक्षीस मिळाले, तर ५,००० हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उज्ज्वल बोंद्रे, इशिका आरेवार, प्रतीक्षा पालखेडे यांचा समावेश होता. तसेच आकांक्षा चंदन हिने २,५०० रुपयाचे बक्षीस, तर सारिका भांगे हिने १,२५० रुपयांचे रोख बक्षीस प्राप्त केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना ८ मार्चला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुख्याध्यापिका एम. एस. धुळे, उपमुख्याध्यापक ए. एम. म्हैसने, पर्यवेक्षक आर. एम. सावरकर, ए. व्ही. गावंडे, ए. आर. बोरकर व पी. एम. मोहोकार यांनी पारितोषिकाचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. या यशस्वी विद्यार्थ्यांना पर्यवेक्षक ए. व्ही. गावंडे व आर. एम. सावरकर, पी. एम. मोहोकार यांनी अध्याय ११ मधील १ ते १०० ओव्यांबद्दल योग्य मार्गदर्शन केले, तर ए.डब्ल्यू. कुलट व जे. व्ही. अवारे यांनी सहकार्य केले.