लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : शहरातील चौघांचा गत दोन दिवसात अकस्मिक मृत्यू झाला. तालुका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तिन मृतदेहांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. तसेच एका मृतकाच्या कुटुंबीयांसह अंत्यविधीला उपस्थित असलेल्या २१ जणांना सर्वोपचार रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.इशरत खान यांनी सांगितले.२२ एप्रिल रोजी बेलदारपुरा भागातील एका इसमाचे निधन झाले. त्याला दारूचे व्यसन होते. दारू न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज कुटुंबीयांनी व्यक्त केला होता.तसेच त्याच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. आरोग्य विभागाने संशय आल्याने त्याच्या कुटुंबातील व अंत्यसंस्कारास उपस्थित असणारे अशा एकूण २१ जणांना तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालायात पाठविण्यात आल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इशरत खान यांनी सांगितले. औरंगपुरा परिसर व स्टेट बँक रोडवर राहणाऱ्या दोघांचा हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू झाला.तसेच एका वृद्ध महिलेचा अकस्मिक मृत्यू झाला. त्यांचे कुटुंब आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तिघांच्याही मृतदेहाची स्वॅब तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याला दोन्हीकडून सहकार्य मिळाले आहे. अहवाल आल्यानंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (शहर प्रतिनिधी)आकस्मिक मृत्यू झाल्यास प्रशासनाला कळवा. आरोग्य विभागाला कोरोना आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सहकार्य करा.- डॉ. ईशरत खान, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, बाळापूर
नागरिकांनी कोरोना आजार नियंत्रणासाठी लॉकडाउनला सहकार्य करा. गर्दी करण्याचा प्रयत्न करू नका. स्वत:ची काळजी स्वत: घ्यावी.- जी. एस. पवार,मुख्याधिकारी, बाळापूर
नागरिकांनी कोरोनाला घाबरू नये. फक्त त्याला घालवण्यासाठी काळजी घ्या. आरोग्य तपासणी पथकाला आजाराची लक्षणे सांगून कोरोना आजारावर नियंत्रण मिळवता येते. यासाठी प्रशासनाला सहकार्य करा.- पुरुषोत्तम भुसारी, तहसीलदार, बाळापूर