- राजेश शेगोकार
अकोला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अलीकडच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करून आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. पश्चिम महाराष्ट्रतील पक्ष अशी ओळख पुसून काढण्यासाठी या आंदोलनाचा मोठा ुफायदा झाला असून, आता लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील सहा लोकसभा मतदारसंघांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले असून, त्यामध्ये विदर्भातील वर्धा व बुलडाणा या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. त्याच अनुषंगाने परवा वर्धेत स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी विदर्भ कार्यकारिणीची बैठक घेऊन गांधी जयंतीपासून राज्यव्यापी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. संघटना म्हणून विदर्भात कार्यविस्तार करतानाच लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीच्याच दृष्टीने ही ‘विदर्भ मोहीम’ असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.भाजपा-शिवसेनेसोबत महायुतीमध्ये सहभागी होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गत लोकसभा निवडणूक लढविली. महायुतीची सत्ता येताच स्वाभिमानीला सदाभाऊ खोत यांच्या रूपाने विधान परिषदेची एक जागा, मंत्रिमंडळात स्थान तसेच रविकांत तुपकर यांना महामंडळ देऊन सत्तेत वाटाही मिळाला; मात्र शेतकºयांच्या प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. दरम्यानच्या काळात कृषी राज्यमंत्री झालेले सदाभाऊ खोत व खासदार शेट्टी यांचे संबंध ताणल्या गेल्यामुळे सदाभाऊंची पक्षातून हकालपट्टी केली. तुपकरांनी महामंडळाचा राजीनामा दिला व स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीमधून बाहेर पडली. सत्तेतून बाहेर पडताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची तीव्रता वाढविली. दूध आंदोलनाची यशस्वी परिणती हा स्वाभिमानीचा आणखी एक विजय होता. अशा अनेक आंदोलनामधून स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर पोहोचली, त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला असल्याने आता लोकसभेची तयारी सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना सध्या सहा जागांची तयारी करीत असली तरी हातकणंगले, माढा, वर्धा व बुलडाणा या चार मतदारसंघांबाबत संघटना प्रचंड आशावादी आहे. बुलडाण्यात स्वाभिमानीच्यावतीने प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना तर वर्धेत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्याच अनुषंगाने परवा वर्धेत राज्यव्यापी आंदोलनाचा बिगुल फुंकल्या गेला आहे. गांधी जयंतीपासून विदर्भात कापूस व सोयाबीन परिषदांचे आयोजन केले जाणार असून, त्याचा समारोप अमरावती जिल्ह्यात होणार आहे. त्यानंतर या आंदोलनाची व्याप्ती विदर्भाबाहेर नेण्याची रणनीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. काँग्रेस आघाडीसोबत किंंवा सेना स्वतंत्र लढत असेल तर त्यांच्यासोबत निवडणूक लढविण्याचा पर्याय खुला ठेवत स्वबळावरच मोर्चेबांधणी करण्यासाठी या विदर्भ मोहिमेचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचाच स्वाभिमानीचा प्रयत्न राहणार आहे. विदर्भाचा विचार केला तर वर्धा अन् बुलडाणा या लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानीची लढत ही राजकीय समीकरणे बदलविणारी ठरणार असल्याने स्वाभिमानीच्या विदर्भ मोहिमेकडे अनेकांचे लक्ष आहे.