- राजेश शेगाेकारअकाेला : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या विराेधात राजू शेट्टी यांनी घेतलेली आक्रमक भूमिका अन् आता राष्ट्रवादीने फिरवलेला शब्द पाहता ‘स्वाभिमानी’ची पावले पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) वळू शकतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर पाठविण्यासाठी राष्ट्रवादीने ऐनवेळी नकार देत १२ आमदारांच्या यादीतून नाव कापल्याची माहिती समाेर आल्यावर स्वाभिमानीचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. गेल्या लाेकसभा निवडणुकीपासून शेट्टी यांनी एनडीएसाेबत फारकत घेत काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली हाेती. आघाडीने दिलेल्या जागेवर शेट्टी यांचा पराभव झाल्याने स्वाभिमानीचा वारू थंडावला हाेता.
शेट्टी राष्ट्रवादीसाेबत बसल्यामुळे संघटनेवरही परिणाम झाला. त्यामुळे शेट्टी यांनी पुन्हा आंदाेलनाची हाक देत ‘शेतकरी नेता’ ही प्रतिमा ठळक करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याची किंमत त्यांना माेजावी लागली, असे कार्यकर्ते बाेलत आहेत. दुसरीकडे, भाजपासाेबत गेल्याने शेट्टींना खासदारकी, सदाभाऊ खाेत यांना मंत्रीपद तसेच रविकांत तुपकर यांना महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले हाेतेे. त्यामुळे राजकीय ताकदीसाठी शेट्टी पुन्हा एनडीएकडे झुकतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
‘एनडीए’साेबतच फायदा, कार्यकर्त्यांचे गणित
शेट्टी यांनी लाेकसभेसाठी काँग्रेस आघाडीकडे हातकणंगले व बुलडाणा या दाेन जागा मागितल्या हाेत्या. मात्र, त्यावेळी हातकणंगलेसाेबत सांगलीची जागा ऐनवेळी देण्यात आली. आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कायम राहिली, तर शेट्टी यांचा प्रभाव असलेल्या हातकणंगले व बुलडाणा या दाेन्ही जागा स्वाभिमानीला मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण या दाेन्ही जागांवर सध्या शिवसेनेचे खासदार आहेत. त्यामुळे भाजपासाेबत गेले तरच राजकीय फायदा हाेऊ शकताे, असे गणित कार्यकर्ते मांडत आहेत.
राजू शेट्टींचे नाव वगळले नाही : अजित पवार
राज्यपालांकडे दिलेल्या यादीतील बारा आमदारांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह काहींची नावे वगळल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “यात कोणतेही तथ्य नाही. राज्य सहकारी बँकेच्या संबंधितांवर ईडी तपास यंत्रणेकडून छापे टाकण्यात आल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दाखवली. परंतु ही बातमी धादांत खोटी, निराधार होती. अशा निराधार बातम्यांमुळे प्रसारमाध्यमांबाबत जनतेच्या मनातील असलेली विश्वासार्हता कमी होईल.”
...अन्यथा जलसमाधी घेणारच : राजू शेट्टी
महापुराने शेतकऱ्यांची वाताहत झाली असून, हे आपत्कालीन संकट शासनास कळत नाही का? सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा जलसमाधी घेणारच, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. रुकडी येथे ‘आक्रोश शेतकऱ्यांचा परिक्रमा पंचगंगेची’ या पदयात्रेप्रसंगी ते बोलत होते.
पूरग्रस्तांना विविध मागण्यांसाठी निघालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदयात्रेस शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला. पदत्रात्रेमुळे पूरग्रस्तांच्या मदतीच्या आशा पल्लवित झाल्याचे पाहायला मिळाले. पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी गावागावातील शेतकरी सहभागी झाले होते. रुकडी येथे अंबाबाई मंदिरामध्ये पदयात्रा आली असता तेथे सभा झाली. केंद्रीय अर्थमंत्री बजेट सादर करीत असताना आपत्कालीन निधी या आयोगाकडे वर्ग करीत असते. केंद्र सरकारने आपत्कालीन निधीमधून महाराष्ट्राला मदत अद्यापही दिलेली नाही. मग महाराष्ट्र भारताच्या बाहेर आहे का, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.