अकाेला : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’चा उद्देश सफल हाेण्यासाठी राज्यात नागरी स्वायत्त संस्थांना सातत्याने दिशानिर्देश दिले जातात. हीरक महाेत्सवाच्या पृष्ठभूमीवर नागरी स्वायत्त संस्थांनी घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाेबतच शहराच्या साैंदर्यीकरणासाठी विविध उपाययाेजना करण्याचे निर्देश शासनाने जारी केले हाेते. या महाेत्सवाचा स्वायत्त संस्थांना विसर पडल्याचे समाेर आले असून, ‘स्वच्छ भारत’ अभियान कागदाेपत्री राबविले जात असल्याचे दिसून येत आहे. शहरामधील वाढती लाेकसंख्या, इमारतींसाठी वृक्षांची हाेणारी कत्तल, सिमेंट रस्त्यांचे निर्माण व घनकचऱ्याच्या समस्येमुळे पर्यावरण धाेक्यात सापडले आहे. शहरातून दैनंदिन निघणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याची याेग्यरीत्या विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे जलस्रोत दूषित हाेणे, हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याची परिस्थिती आहे. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने घनकचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचे निर्देश जारी केले आहेत. या प्रक्रियेत सातत्य ठेवण्याच्या उद्देशातून राज्य शासनाने ‘हीरक महाेत्सवी नागरी महाराष्ट्र स्वच्छता अभियान’ राबविण्याचे निर्देश दिले हाेते. मात्र नागरी स्वायत्त संस्थांनी हे अभियान कागदाेपत्री राबविल्याचे समाेर आले आहे.
विलगीकरण नाही; प्रक्रियेला फाटा
घरातून निघणारा कचरा वाहनात जमा करताना त्याचे ओला, सुका व घातक अशा पद्धतीने विलगीकरण करण्याचे निर्देश आहेत. अभियानात ओल्या कचऱ्यावर कम्पाेस्टिंग अथवा बायाेमिथेनेशन प्रक्रिया करणे, सुक्या कचऱ्यावर दाेनवेळा प्रक्रिया करणे तसेच बांधकामातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची स्पष्ट सूचना हाेती.
रस्त्यांची सुधारणा व साैंदर्यीकरणाकडे पाठ
रस्त्यालगत साचलेला कचरा, माती, दगड, अर्धवट बांधकाम साहित्याची तातडीने विल्हेवाट लावणे, दुभाजकांची दुरुस्ती करणे, रस्त्याच्या कडेला झाडे लावून त्यांची निगा राखणे, नाल्यांची सफाई करणे, माेकळ्या जागांवर कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्याच्या निर्देशांकडे महापालिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.