अकोला: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अनुदानासाठी अर्ज केलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपैकी ८०० विद्यार्थ्यांना २०१९-२० या वर्षातील अनुदानाचा लाभ अद्यापही मिळाला नाही. वर्ष उलटूनही १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी शासनाकडून मिळला नसल्याने, जिल्ह्यातील संबंधित विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
डाॅ. बाबासाहेब आंंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना निवास, भोजन व शैक्षणिक साहित्याचा खर्च भागविण्यासाठी प्रती वर्ष ३५ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्ह्यात अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी गत १३ जानेवारीपर्यंत ३ कोटी ८२ लाख ९९ हजार रुपयांचे अनुदान शासनामार्फत प्राप्त झाले. प्राप्त अनुदानाची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली. परंतू उर्वरित १ कोटी ७० लाख रुपयांचे अनुदान अद्याप शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने वर्ष उलटूनही जिल्ह्यातील ८०० विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे स्वाधार योजनेंतर्गत प्रलंंबित अनुदानाचा निधी शासनाकडून केव्हा प्राप्त होणार यासंदर्भात अनुदानाच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
समाजकल्याण सहायक आयुक्त
कार्यालयाने केली निधीची मागणी!
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत २०१९-२० वर्षात अर्ज केलेल्या जिल्ह्यातील ८०० विद्यार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाने समाजकल्याण विभागाच्या अमरावती येथील प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाकडे केली आहे.