अकोला : काही विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे निकाल बाकी असल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत ते अर्ज करू शकले नव्हते. त्यामुळे आता स्वाधार योजनेंतर्ग अर्ज करण्यास मुदवाढ देण्यात आली असून, दि. ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदत आहे. विद्यार्थ्यांनी तत्काळ अर्ज करावा, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या, परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अथवा प्रवेश न घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. काही विद्यार्थ्यांच्या परिक्षेचे निकाल बाकी असल्यामुळे ते योजनेंतर्गत अर्ज भरू शकले नाहीत. त्यामुळे अर्ज वाटप तसेच अर्ज स्वीकृतीसाठी दि. ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली. पात्र विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन (निमवाडी), पोलीस वसाहत दक्षता नगर येथे कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.