नया अंदुरा : परिसरातील पहिल्याच पावसात शेतकऱ्यांनी नगदी पीक मुगाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली असून, त्यानंतर दमदार पावसामुळे पिके बहरली आहेत. मात्र बहरलेल्या पिकांवर वन्यप्राणी ताव मारीत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. येथील अल्पभूधारक शेतकरी कांतीलाल रामलाल गुप्ता व चंपालाल रामलाल गुप्ता यांच्या कारंजा रमजानपूर शेतशिवारातील शेतात रानडुकरांनी व हरणांच्या कळपांनी हैदोस करून तीन एकरातील मूग भुईसपाट करून नुकसान केले आहे .
यंदा कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी आर्थिक संकटात आहेत. शेतकऱ्याने कर्ज काढून खते, बी-बियाणे विकत आणून पेरणी केली. पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. त्यानंतर अतिपावसामुळे पिकांचे नुकसान झाले. सद्यस्थितीत पिके बहरलेली व शेंगा धारण अवस्थेत असताना वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला आहे. येथील शेतकरी कांतीलाल गुप्ता, चंपालाल गुप्ता यांच्या तीन एकरातील पिकाचे रानडुकराने मोठे नुकसान केले. वनविभागाने, कृषी सहायक व तलाठी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
--------------------------
रात्री द्यावी लागते गस्त
शेतशिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला आहे. रात्रीच्या सुमारास शेतात जाऊन पिकांची नासाडी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी रात्री स्वत:चा जीव धोक्यात टाकून जागरण करून पिकाचे रक्षण करीत आहेत. त्यामुळे वनविभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
-----------------------
वन्यप्राण्यांच्या धुमाकुळामुळे तीन एकर मूग पीक शेंगा अवस्थेत असताना रानडुकरामुळे अतोनात नुकसान झाल्याने आर्थिक संकट कोसळले आहे. वनविभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा.
- कांतीलाल गुप्ता, शेतकरी, नया अंदुरा