अकोला: जिल्ह्यात सण उत्सवाला सुरुवात झाली असतानाच स्वाइन फ्लूने अकोलेकरांच्या चिंतेत भर पाडलीआहे. जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या आणखी दोन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील एक रुग्ण महापालिका क्षेत्रातील असून, एक रुग्ण अकोट शहरातील असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. या रुग्णांवर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सध्या नव्याने कोविड पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे काही रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो, धाप लागते, ऑक्सिजन पातळीही खालावते, मात्र त्यांचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह येत असल्याने डॉक्टरांची चिंता वाढविली आहे. तज्ज्ञांच्या मते असे रुग्ण स्वाइन फ्लूचे असू शकतात. अकोल्यातील काही खासगी रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांवर स्वाइन फ्लूचे संदिग्ध रुग्ण म्हणून उपचार सुरू असतानाच आठवडाभरापूर्वी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आणखी दोन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांत स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून काही रुग्णांना जीवही गमवावा लागल्याचे आकडे सांगतात. आता अकोल्यातही स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्याने अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. कोविड आणि स्वाइन फ्लूची लक्षणे सारखीच असल्याने रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
अमरावती जिल्ह्यातील एका रुग्णावर अकोल्यात उपचार
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील रहिवासी असलेल्या एका रुग्णावर अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या व्यतिरिक्त बुलढाणा जिल्ह्यातील दोन रुग्णांवर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. रुग्णांमध्ये रामनगर लोणार येथील ५६ वर्षीय महिला आणि खिर्डा गावातील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.