लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अमानखा प्लॉट परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या ६० वर्षीय वृद्ध महिलेला स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. दुर्गा रामदास मोहोड असे रुग्णाचे नाव असून, रविवारी मुंबईवरून या व्यक्तीचा अहवाल आला असून, त्यांना स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे या अहवालात नमुद आहे. यावरून जिल्ह्यात अद्यापही स्वाइन फ्लूचा धोका कायम असल्याचे समजते.मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बु. येथील रहिवासी दुर्गा रामदास मोहोड (६०) यांना सर्दी, ताप आल्याने त्यांना अमानखा प्लॉटमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गत तीन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांच्या रक्ताचे नमुने स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आले होते. या नमुन्यांचा अहवाल रविवारी प्राप्त झाला असून, त्यामध्ये मोहोड या महिलेस स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अहवाल प्राप्त होताच सदर महिलेला अमानखा प्लॉटमधील खासगी हॉस्पिटलमधून एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये रविवारी रात्री हलविण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.आरोग्य यंत्रणा झोपेतमूर्तिजापूर तालुक्यातील काही गावात स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आढळत असल्याच्या तक्रारी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींकडे दोन्ही यंत्रणांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर काही दिवसातच मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी येथील महिलेला आता स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बालक, वृद्धांना जपा!वृद्धांसह पाच वर्षांखालील बालकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते, त्यामुळे या घटकांना विविध साथीचे आजार लवकर होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत या मंडळींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण आढळला!
By admin | Published: July 10, 2017 2:25 AM