बुलडाणा : मलकापूर येथे शनिवारी स्वाइन फ्लू पॉझिटीव्ह रुग्ण आढळला असून उपचारासाठी त्याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. आणखी दोन संशयीत रूग्णांवर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये एक रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयाचा कर्मचारी आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत स्वाइन फलूमुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात स्वाइन फलूचा विळखा अधिक घट्ट होत आहे. चिखली तालुक्यातील ग्राम इसोली येथील महिला व जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील एका युवकाचा गत आठवड्यात स्वाइन फलूने मृत्यू झाला होता. जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती स्वाइन फलू पॉझिटीव्ह अनुसया शिवसिंह परिहार (वय ५५ रा.चांधई ता. चिखली), अंकुश नामदेव शेळके (वय २२ रा.भादोला ता. बुलडाणा) व जिल्हा सामान्य रूग्णालयातील कर्मचारी आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत मुलसिंह राठोड (वय ३५) यांना उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने सुटी देण्यात आली. मलकापूर येथील गजानन भास्कर पाटील (वय ३0 ) यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केल्यानंतर तपासणीअंती स्वाइन फलू पॉझिटीव्ह आढळल्याने त्यांना अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयातील चौकीदार शे.सलमान शे.हमीद वय २३, योगेश अरूण शेभेंकर (वय १६) यांनाही जिल्हा सामान्य रूग्णालयात संशयीत म्हणून भरती करण्यात आले असून त्यांच्यावर स्वाइन फलू कक्षात उपचार सुरू आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात स्वाइन फलू पॉझिटिव्ह रुग्ण आढळला
By admin | Published: March 15, 2015 12:08 AM