आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला अकोला : राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या स्वाइन फ्लू या प्राणघातक आजाराने जिल्ह्यात हळूहळू पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. एच-१ एन-१ या घातक विषाणूंपासून होणाऱ्या या संसर्गजन्य आजाराचा आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण अकोला शहरात आढळून आला असून, आतापर्यंत या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सहावर पोहोचली आहे. या रुग्णांवर खासगी इस्पितळांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.वराहांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे स्वाइन फ्लू हा आजार होतो. वराहांच्या सतत संपर्कात राहिल्यास मनुष्याला या आजाराची बाधा होण्याची शक्यता असते. हा आजार संसर्गजन्य असून, हवेच्या माध्यमातून एकापासून दुसऱ्याला या आजाराची लागन होते. या विषाणूंचा प्रसार रुग्णांच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम, त्याची थुंकीमधून होतो. शहरात मार्च महिन्यात स्वाइन फ्लूचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. तेव्हापासून या आजाराने डोके वर काढले असून, आतापर्यंत सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. रविवार, २ एप्रिल रोजी शहरातील एका ४३ वर्षीय महिलेस एका खासगी इस्पितळात स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आल्यानंतर दाखल करण्यात आले. तपासणीनंतर सदर महिलेस स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व रुग्णांवर खासगी इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या आजाराची लागन झालेल्या शहरातील निमवाडी परिसरातील एका रुग्णास सुटी झाल्याची माहिती आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वाइन फ्ल्यूचा संशयित किंवा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अशी घ्यावी खबरदारी!- हात नेहमी साबणाने स्वच्छ धुवावे- गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे- स्वाइन फ्ल्यू लागन झालेल्या रुग्णापासून दूर राहावे- खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा- भरपूर पाणी प्यावे व पौष्टिक आहार घ्यावा- पुरेशी झोप घ्यावी.जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एच-वन एन-वन या विषाणूंचा प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त असलेल्या ‘टॅमी फ्लू’ या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. गर्भवती माता, वयोवृद्ध मंडळी यासारख्या ‘हायरिस्क’ गटातील रुग्णांसाठी लसही उपलब्ध आहे. - डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.