अकोला: पारा ४२ अंशांच्या पार गेला असतानाही शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत असून, या संसर्गजन्य आजाराची लागण झालेले तीन रुग्ण दगावल्याने शहरासह जिल्ह्यातील नागरिक धास्तावले आहेत. दरम्यान, शनिवारी या आजाराची लागण झाल्याचे नवीन रुग्णांची माहिती समोर आली नसली, तरी लोकांमध्ये स्वाइन फ्लूची धास्ती कायम असल्याचे चित्र आहे.एच १ एन १ या विषाणूंपासून होणारा स्वाइन फ्लू हा श्वसन यंत्रणेशी संबंधित आजार आहे. सामान्यपणे हा आजार वराहांना होतो. वराहांपासून विषाणूंमुळे मनुष्याला हा आजार होण्याची शक्यता असते. अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या आजारास कारणीभूत असलेला एच १ एन १ हा विषाणू २४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानात तग धरू शकत नाही. अकोल्यातील तापमान ४४ अंशांवर गेले असतानाही शहरात या आजाराचे नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून, तिघांना सुटी झाली आहे. सध्या तीन पॉझिटिव्ह रुग्णांवर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. तर चार संशयित रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल आहेत. या रुग्णांपैकी दोघांचा तपासणी अहवाल आला असून, त्यांना स्वाइन फ्लू नसल्याचे निष्पन्न झाले आहे. हवेमार्फत विषाणूंचा प्रसार होत असल्याने लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, तसेच सावधगिरी बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारीच्या उपायांचे पालन केले पाहिजे. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच तातडीने शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल व्हावे. शासकीय रुग्णालयांमध्ये टॅमी फ्लू औषधांचा भरपूर साठा असून, इतर यंत्रणाही सज्ज आहे. - डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला
‘स्वाइन फ्लू’ची धास्ती अजूनही कायम!
By admin | Published: April 15, 2017 1:04 AM