पातुरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणपातूर : शहरातील गुरुवारपेठ भागात राहणाऱ्या ३८ वर्षीय युवकाचा स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी घडली. दरम्यान, एवढी मोठी घटना घडल्यानंतरही आरोग्य विभागाने कुठलीही उपाययोजना केली नसल्याचे चित्र आहे. शहरातील गुरुवारपेठ परिसरात राहणारे मनीष त्र्यंबक काळपांडे यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा १५ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यांना स्वाइन फ्लूसदृश आजाराची लागण झाल्याची चर्चा आहे. स्वाइन फ्लूसदृश आजाराने एका युवकाचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे; मात्र प्राथमिक आरोग्य के ंद्रातील कर्मचाऱ्यांनी या घटनेची साधी दखलही घेतली नाही. मनीष काळपांडे अकोला शहरातील कौलखेड एसटी वर्कशॉपमध्ये दोन ते तीन वर्षांपासून कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत होते. १२ एप्रिल रोजी त्यांना श्वास घेण्यास खूपच त्रास होत असल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तपासण्याचे नमुने आधी नागपूर व नंतर मुंबईला पाठविण्यात आले आहे. उपचारादरम्यान मनीष यांचा शनिवारी मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी व एक चार वर्षांची मुलगी आहे.दरम्यान, याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्याकडे सोमवारी रिपोर्ट येणार आहे. त्यानंतर संबंधित रुग्ण हा स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आहे किंवा नाही, हे स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वाइन फ्लू संशयित युवकाचा मृत्यू
By admin | Published: April 17, 2017 2:08 AM