जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेत ६४३ वीज जोडण्या असून, त्यांच्याकडे १४ कोटी ८२ लाख रुपयांची थकबाकी आहे. बाळापूर उपविभागात ११० सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेत सुमारे २ कोटी रुपयांची थकबाकी आहे. अकोट उपविभागात १०६ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेत ३ कोटी ६२ लाख रुपये, तेल्हारा उपविभागातील १३८ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेत सुमारे ४ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
जिल्ह्यातील १०३१ पथदिव्यांच्या जोडण्या विविध ग्रामपंचायतीकडे आहेत. याची थकबाकी ८२ कोटी ६५ लाख रुपये आहे. केवळ ऑगस्ट महिन्यात या जोडण्यांनी ९३ लाख रुपयांची वीज वापरली आहे. अकोला ग्रामीण विभागात ७२५ पथदिव्यांच्या जोडण्या असून यांची थकबाकी ६९ कोटी रुपयांच्या घरात आहे. अकोट विभागात ३०६ जोडण्या असून यांची थकबाकी १३ कोटी ८८ लाखांच्या घरात आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांची थकबाकीही वाढली आहे. जून अखेरीस ६५१ शाळांकडे ३१ लाख ६९ हजार रुपये थकबाकी आहे. मूर्तिजापूर उपविभागातील १११ जिल्हा परिषद शाळांकडे ५ लाख ११ हजार रुपये, अकोट उपविभागात १०८ शाळांकडे ७ लाख ९ हजारांची थकबाकी आहे. वरील थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणकडून सर्व अधिकारी सतत पाठपुरावा करीत आहेत. जर थकीत देयकाची रक्कम वसूल न झाल्यास आगामी काळात महावितरणला नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा
सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आणि पथदिव्यांची थकबाकी वसूल व्हावी यासाठी महावितरणकडून जिल्हा परिषदेकडे सतत पाठपुरावा सुरु आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून थकबाकीची माहिती देऊन ती वसूल व्हावी यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. ६ ऑगस्ट रोजीच्या शासन आदेशाची प्रतही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. यानुसार सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आणि पथदिव्यांची चालू देयकाची रक्कम संबंधित ग्रामपंचायतीने भरायची आहे. यासंदर्भात दिरंगाई झाल्यास स्थानिक सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे ग्रामपंचायतीने पथदिवे आणि सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेची चालू देयके विहित कालावधीत भरावीत, असे यात स्पष्ट नमूद केले आहे.
अशी आहे थकबाकी
ग्राहक जोडणी थकबाकी
पाणीपुरवठा योजना - ६४३ १४ कोटी ८२ लाख
पथदिवे - १०३१ ८२ कोटी ६५ लाख
जिल्हा परिषद शाळा - ६५१ ३१ लाख ६९ हजार