कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश आहे; मात्र या आदेशाला न जुमानता काही महाभाग रस्त्यांवर अकारण फिरताना आढळून येत आहेत. शहरासह ग्रामीण भागातही हीच स्थिती आहे. आरोग्य, पोलीस व पालिका प्रशासन समजावून, विनंती करून हतबल झाले आहेत.
--बॉक्स--
दवाखान्याचे कारण सर्वाधिक !
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे अनेकजण अकारण फिरताना आढळून आले. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत अनेकांनी एकसारखीच कारणे सांगितली. कोणी म्हणाले, दवाखान्यात जातोय तर कोणी म्हणाले, मेडिकलला जातो. शहरातील काही चौकात पोलिसांनी या रिकामटेकड्यांवर कारवाई केली. यामध्ये काही नागरिकांनी दवाखान्याची चिठ्ठी तर काहींनी औषधे दाखविली. वेगवेगळी कारणे दाखवून अनेकजण सुटका करवून घेत होते.
--बॉक्स--
पोलीस करताहेत मुळात जाण्याचा प्रयत्न
अनेक महाभाग दोन-तीन दिवसांपासून मेडिकल बिले, दवाखान्याच्या फायली सोबत घेऊन फिरत असल्याचे निदर्शनास आले. अशी कोणी फाईल दाखवली की, पोलीस अधिकारी त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.
--बॉक्स--
भटकणाऱ्यांची ॲन्टिजेन चाचणी करण्याची गरज
अनेक शहरात अकारण भटकणाऱ्यांच्या ॲन्टिजेन चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये काहीजण पॉझिटिव्ह येत असल्याने त्याच धर्तीवर अकोला शहरातही रिकामे फिरणाऱ्यांची ॲन्टिजेन चाचणी करण्याची गरज आहे.