शहरातील सर्वात प्रमुख व वर्दळीचा रस्ता असलेल्या गाेरक्षण राेडची २०१५ पूर्वी दुरवस्था झाली हाेती. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी हा रस्ता १८ मीटर रुंद करण्याचा निर्णय घेतला. आ. गाेवर्धन शर्मा यांनी सिमेंट रस्त्यासाठी शासनाकडून निधी खेचून आणत निर्माणकार्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे साेपवली. शहरातील सर्वात प्रशस्त रस्ता अशी ओळख असलेल्या गाेरक्षण राेडच्या रुंदीकरणादरम्यान अनेक ठिकाणी भूमिगत नाल्या हाेत्या. त्यातून सांडपाण्याचा वेगाने निचरा हाेण्यासाठी नाल्यांचेही रुंदीकरण अपेक्षित हाेते. रस्त्याची ‘डिजाइन’तयार करताना ‘पीडब्ल्यूडी’ने यासर्व बाबींचे नियाेजन करणे क्रमप्राप्त हाेते. तसे न झाल्यामुळे महापारेषण समाेरील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात सांडपाण्याची समस्या निर्माण झाली. त्यासाठी शनिवारी मुख्य रस्त्याची ताेडफाेड करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
रहिवाशी निमीत्त; सुत्रधार दुसरेच
याठिकाणी रस्त्याखाली लहान नाली असल्याने सांडपाण्याचा वेगाने निचरा हाेत नाही. साचलेल्या पाण्यामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत हाेता. यासाठी निवेदनावर काही नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. परंतु खरी अडचण रस्त्यालगत उभारलेल्या टाेलेजंग वाणिज्य संकुलांसमाेर निर्माण झाली हाेती. रहिवासी केवळ निमित्त ठरल्याची चर्चा आहे.
मनपाने दिला नकार
रस्त्याची ताेडफाेड करुन त्याखालील नालीच्या रुंदीकरणासाठी सुरुवातीला मनपाच्या बांधकाम विभागाकडे परवानगी मागण्यात आली. परंतु ही बाब रस्त्याचे निर्माण करताना लक्षात आली नाही का, असा सवाल करीत प्रशासनाने नकार दिला. हा रस्ता मनपाच्या अखत्यारित असला तरी त्याचे निर्माण ‘पीडब्ल्यूडी’ने केल्याने परवानगीचा चेंडू संबंधित विभागाकडे टाेलविण्यात आला.