अकोला : शिवर येथील ढोने कॉलनीतीळ रहिवासी एका आरोपीस जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केल्यानंतर तो बाभूळगाव येथील महाकाली हॉटेलमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याच्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी या तडीपार आरोपीला शनिवारी अटक केली. त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवर येथील रहिवासी जगदीश ऊर्फ जग्गू दिवानचंद घ्यारे (वय ३० वर्षे) हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्यास मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ नुसार अकोला जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. मात्र, या तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून तो बाभूळगाव जहागीर येथील हॉटेल महाकाली येथे बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर वानखेडे यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह धाव घेऊन आरोपीस अटक केली. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार किशोर वानखेडे, एएसआय बोधडे, सानप, राठोड, मात्रे यांनी केली.