अकोट फाइलमधील प्रकार; आरोपी अटकेत
अकोला : अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आरोपीस दोन वर्षांसाठी तडीपार केल्यानंतरही तो शहरात बेकायदेशीर वास्तव्य करीत असताना हातात शस्त्र घेऊन त्याने अकोट फाइलमध्ये मंगळवारी रात्री दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. ही माहिती दहशतवादविरोधी कक्षाला मिळताच त्यांनी तातडीने धाव घेऊन आरोपीस अटक केली.
अकोट फाइलमधील सादात नगर येथील रहिवासी शेख अमीर शेख युनूस यास जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. मात्र तडीपारी असतानादेखील हा आरोपी शहरात बेकायदेशीर वास्तव्य करीत होता. एवढेच नव्हेतर, पोलिसांच्या नाकावर टिच्चून हातात धारदार शस्त्र घेऊन त्याने मंगळवारी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. तडीपार आरोपीचे बेकायदा वास्तव्य व वरून शस्त्र घेऊन दहशत पसरविणे हा गंभीर प्रकार दहशतवादविरोधी कक्षाला कळताच त्यांनी तातडीने धाव घेऊन आरोपीस अटक केली. यावरून तडीपार आरोपी हे केवळ कागदोपत्रीच होत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तसेच स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाने आतापर्यंत तडीपार असलेल्या व अकोल्यात बेकायदेशीर वास्तव्य करीत असलेल्या आरोपींना अटक केली आहे. या कारवायांवरून तडीपारी ही केवळ कागदोपत्रीच होत असल्याचेही सिद्ध होत आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अकोट फाइल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.