शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनतेल्हारा : शासनाच्या नाफेडद्वारा तूर खरेदीमध्ये सुरुवातीपासून तेल्हाऱ्याचे केंद्र वादाच्या भोवऱ्यात भ्रष्ट कारभारासाठी कुप्रसिद्ध झाले आहे. या केंद्रावर मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची तूर शेतकऱ्यांच्या नावावर मोजून खऱ्या शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमापासाठी वाट पहावी लागत असून, तूर खरेदी केंद्राच्या कारभाराची चौकशी करून भ्रष्टाचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ३ मे रोजी निवेदनाद्वारे केली आहे.तूर खरेदी केंद्रावर हलक्या प्रतिचे कारण देऊन शेतकऱ्यांची तूर परत केल्या जाते, तर व्यापाऱ्यांचा निकृष्ट माल खरेदी केल्या जातो. व्यापाऱ्यांनी मातीमिश्रित तूर संगनमत करून नाफेडच्या अकोला येथील गोडावूनवर पाठविल्या जाते. शासनाकडून वारंवार कारवाईच्या वलग्ना केल्या जातात. परंतु अद्याप एकाही दोषीवर कारवाई होत नाही. या सर्व प्रकरणात कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संस्था व नाफेडचे अधिकारी सामील असून, २२ एप्रिलच्या दिवशी खऱ्या शेतकऱ्यांचे मोजमाप थांबवून बाजार समितीच्या संचालकांच्या मर्जीतील शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना पुरवणी टोकन देऊन मोजमापात भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचेही निवेदनात नमूद आहे. बाजार समिती व खरेदी विक्री संस्था एकमेकांवरआरोप करून जबाबदारी झटकत असून, पंचनामे झाल्यानंतरही खरेदी केंद्रावर तूर उतरविली जात आहे. मार्केटच्या एन्ट्री बुकमध्ये नोंद नसलेले वाहनं नाफेडच्या रांगत उभे असून, या सर्व भ्रष्ट व्यवस्थेची चौकशी होऊन दोषीवर कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनात असून, निवेदनावर विजय बोरडे, उत्तम नळकांडे, महेश वडतकार, छोटू वडतकार, धनंजय गावंडे, ज्ञानेश्वर हिंगणकर, रामराव उजाड, प्रदीप महल्ले, राजेश्वर घावट, शुभम वडतकार, पांडुरंग हिंगणकर, किसन उजाड, संदीप अवारे, सुनील कोरडे, उमेश वाकोडे, नीलेश बाजोड, विलास महाले व प्रजित वडतकार आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.