जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांच्या उपचारविषयक उपाययोजनांच्या कामावर ताण पडत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाबाधीत रुग्णांना उपचारासाठी खासगी कोवीड रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे; मात्र परिस्थितीचा गैरफायदा घेऊन, काही खासगी कोवीड रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारासाठी शासनामार्फत निश्चित करण्यात आलेल्या दरापेक्षा जास्त दराने पैसे घेण्यात असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. त्यामुळे उपचारासाठी निर्धारित दरापेक्षा जादा दराने पैशाची आकारणी करणाऱ्या संबंधित खासगी कोवीड रुग्णालयांवर कारवाइ करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपाचे प्रभारी आयुक्त पंकज जावळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डाॅ.नितीन अंभोरे, डाॅ.श्यामकुमार सिरसाम, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. अस्मिता पाठक, डाॅ.मनिष शर्मा आदी उपस्थित होते.
कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारासाठी शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार पैशाची आकारणी न करता जादा दराने पैसे घेणाऱ्या जिल्ह्यातील खासगी कोवीड रुग्णालयांवर कारवाइ करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार निर्धारित दरापेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या खासगी कोवीड रुग्णालयांवर कारवाइ करण्यात येणार आहे.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी