क्षय रुग्णांची माहिती देणे बंधनकारक
अकोला : कोणत्याही खाजगी रुग्णालयात उपचारास येणाऱ्या रुग्णाला क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला; जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय अकोला येथे देणे बंधनकारक आहे. तथापि अशी माहिती न देणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
यासंदर्भात जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे लोक याबाबत आरोग्य विभागास माहिती देणार नाहीत अशा संस्था किंवा व्यक्तींना क्षयरोगाचा प्रसार करण्यासाठी जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम २६९ व २७० नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या कलमांतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तीस किमान सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद आहे. तरी सर्व संबंधितांनी दरमहा नोटीफाय होणाऱ्या क्षयरुग्णांची अद्ययावत माहिती खालील पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर किंवा ९६५७२३३१६५ या व्हॉट्सॲप मोबाइल क्रमांकावर पाठवावी. याबाबत दिरंगाई झाल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.